सत्तार शेठ, एक म्हण आहे ना, अगदी तसंच तुमचं झालंय. ’कशात-काय-अन-फाटक्यात-पाय’. मोठी राणा भीमदेवी गर्जना करीत तुम्ही आमखास मैदानावर लोकसभेचा निर्णय जाहीर करण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे काल आमखास मैदानावर तुमचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. मात्र तरीही तुम्ही निर्णय दिला नाही. अहो, या गर्दीला तुम्ही गृहीत धरत आहे का? तुम्ही स्वतःला लोकनेते समजता, जनतेची नस तुम्हाला ओळखता येते, असा दावा करता. मग आता या लोकांना किती दिवस चालवणार... वारंवार निर्णय बदलत तुम्ही स्वतःचं हसं करून घेत आहात. तुम्ही बंड केल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती या दरम्यान च्या चर्चा तुम्ही जरा ऐकाच ! विरोधकांचे सोडा तुमचे समर्थकच खाजगीत काय बोलतात याचा सुगावा तुम्हाला लागला लागलेलाच नाही. सोशल फ्रेंडली बनवून राजकारण करता येत नाही. तुम्ही धुरंदर आहात, चाणाक्ष हात तरीही तुम्हाला हे कसे उमगले नाही याचे आश्चर्य वाटते. जनतेत राहून जेवढा राजकीय शहाणपणा येतो तेवढा सोशल मीडियातल्या अथवा माध्यम प्रतिनिधींमध्ये राहून येईल याची खात्री नाही. ’जनतेची तोडून नाडी... मीडियासोबत तुमची गाडी... असंच काहीसं तुमचं झालंय. तुमच्या या प्रसिद्धी प्रेमाने कार्यकर्ते दुरावत आहेत जरा हेही समजून घ्या.
गेल्या महिनाभरापासून तुम्ही ज्या कोलांट्या उड्या मारत आहात त्याने तुमच्या राजकीय विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण झालाय. सिल्लोड तालुक्यात तर चर्चा आहे, विधानसभेच्या तोंडावर सत्तार भाजप वासी होणार ! आता बोला.... काँग्रेससोबत एवढा टोकाचा वाद करून तुम्ही पुन्हा तलवार म्यान करू शकता का ? याचाही विचार करावा. आमखास मैदानावर निर्णय जाहीर केला असता तर ’बोले तैसा चाले’ ही प्रतिमा निर्माण झाली असती. मात्र तुम्ही संधी गमावली. या मेळाव्यातही तुम्ही संभ्रम कायम ठेवला. राजकारणात वारंवार संधी येत नसतात तातडीने निर्णय घ्यावे लागतात तिथेच तुम्ही कमी पडला. जर अशोक चव्हाणांना विचारून तुम्हाला निर्णय घ्यायचा होता तर आमखास मैदानावर गर्दी जमविण्याचे कारणच काय ? तुम्ही म्हणाला, कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेणार. मग कार्यकर्त्यांनी कुठे सांगितले, अशोक चव्हाण यांना विचारा म्हणून ! हे प्रश्न आहेतच. याची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागतील. लोकसभा निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच तापला आहे. एक एक दिवस महत्त्वाचा आहे आणि तुम्ही मात्र दोन-दोन दिवस पुढे ढकलत आहात. तडजोड झाली की तुम्ही लगेच निर्णय जाहीर कराल, असेही बोलले जाते. तुमच्याशी तडजोड करेल कोण ? हा प्रश्न आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही विश्वासार्ह वाटता का, भाजप-सेना तुमच्यावर विश्वास ठेवेल का, एमआयएमची तुमच्याबाबत ची भूमिका सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एकला चलो वर ठाम राहिले पाहिजे होते. आमखासवरच हा निर्णय झाला असता तर कार्यकर्त्यांत जोश निर्माण झाला असता. समर्थकांची, मतदारांची वज्रमूठ शाबूत राहिली असती. मात्र तुम्ही तळ्यात-मळ्यात सुरू ठेवले. आता समर्थक सैरभैर झाले आहेत. पक्षाची ताकद काय असते ते पक्ष सोडल्यानंतर कळते. तुम्हालाही ते कळेलच. काँग्रेस नेत्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवून तसा संदेश दिलाच आहे. अन सोबतीचे मोहरेही काँग्रेस कधी पळवेल याचा नेम नाही. तुम्ही भूमिका जाहीर करा मग समजेल तुम्हालाआपले कोण अन परके कोण. यालाच म्हणतात राजकारण...तुम्हास अधिक सांगणे न लगे !